रायगड | चक्रीवादळामुळे झाडांचे नुकसान; 1 ते 5 जूनदरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम

अलिबाग – तोक्ते चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात बसला असून, जिल्ह्यातील जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून, खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले असल्याने 1ते 5 जूनदरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

तोक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील 6 हजार 26 घरांचे अंशतः नुकसान झाले. यामधील 4 हजार 937 घरे ग्रामीण भागातील आहेत. चक्रीवादळात घराची भिंत, सिमेंटचे ठोकले, झाड व झाडांची फांदी अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले. तसेच 2 जनावरांचा मृत्यू झाला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. विद्युत पुरवठा खंडित झाला. 594 विद्युत पोल व 12 ट्रान्सफार्मरचे नुकसान झाले. यामधील 424 पोल व 7 ट्रान्सफार्मर ग्रामीण भागातील आहेत.

विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. चक्रीवादळात झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे 1 ते 5 जून दरम्यान जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यामध्ये येथील भौगोलिक परिस्थिती अनुरूप झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल विभाग, जिल्हा परिषद प्रशासन, पोलिस प्रशासन, कृषी विभाग, विद्युत वितरण कंपनी, बांधकाम विभागासह इतर शासकीय विभागांनी एकजुटीने चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न केले. चक्रीवादळापासून बचाव कसा करावा व याबाबतच्या उपाययोजनांची व्यापक जनजागृती केली. नागरिकांचे सर्व यंत्रणेला सहकार्य लाभले यामुळे चक्रीवादळात मोठी हानी टाळता आली. यामुळे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांचे डॉ. किरण पाटील यांनी आभार मानले आहेत.

निसर्ग चक्रीवादळानंतर वर्षभराच्या आत तोक्ते चक्रीवादळ धडकले. या वादळांमुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक कटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. बदलत्या जागतिक हवामान परिस्थितीमुळे खोल समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीवर बसत आहे. ही बाब विचारात घेऊन येथील घरांची व कार्यालयांची संरचना बदलणे आवश्यक आहे. घरांवर मोठ्या प्रमाणात बसविलेले सिमेंटचे पत्रे उडाल्याने घरांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे येथील घरे व कार्यालये कौलारू किंवा आरसीसी बांधकामाची उभारणे गरजेचे असल्याचे मत डॉ. किरण पाटील यांनी मांडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.