चार मटका अड्डयावर छापे; सात हजार रुपयांसह पाचजण ताब्यात
सातारा (प्रतिनिधी) : शहतील उपनगरात सुरू असलेल्या चार मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. अमोल आनंद वासुदेव (रा. मंगळवार पेठ, सातारा), शरद शामराव साळुंखे (रा. शाहूनगर), निलेश प्रकाश गायकवाड (रा. शनिवार पेठ), मकरंद प्रभाकर कुलकर्णी (रा. यादोगोपाळ पेठ), अरजून शिवालाल राठोड (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर व परिसरात सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला होता. केवळ करोना बंदोबस्ताला पोलीस गुंतल्यामुळे अवैध धंदे बोकाळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर शहरातील गुरुवार परज, जुना मोटार स्टॅंड परिसर, समर्थ मंदीर परिसरात काही लोक मटका अड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती.
पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सुचना केल्या. त्यानुसार साबळे यांनी त्याठिकाणी सापळा लावून मटका घेण्यासाठी आलेल्या वरील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मटका अड्डा चालवत असल्याची कबुली त्यांनी दिली. संशयितांना पुढील कारवाईसाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार उत्तम दबडे, संतोष पवार, मोहन नाचन, शरद बेबले, नितीन भोसले, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, गणेश कापरे, केतन शिंदे, संजय जाधव यांनी केली.