नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका केली होती. त्याला आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना ‘रेवडी संस्कृती’ म्हटलं आहे. भाजपासाठी हे पचवणं अवघड आहे. कारण, त्यांचा पक्ष तर ४० टक्के कमिशनवर विश्वास ठेवतो,” असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.
“पंतप्रधान सांगतात, की काँग्रेस दिलेली आश्वासने निवडणुकीनंतर पूर्ण करणार नाहीत. पंतप्रधानांनी खरे सांगितलं आहे. भाजपासाठी हे काम करणं अशक्य आहे. जे ४० टक्के कमिशन घेतात, ते अशा प्रकाराच्या योजना लागू करू शकत नाहीत,” असा टोला राहुल गांधींनी भाजपाला लगावला आहे.
“कर्नाटकात कोणाचं सरकार बनणार, हे लोकांनी ठरवायचं आहे. मागील वेळी तुम्ही सरकार निवडलं होतं. पण, भाजपाने आमदारांना खरेदी करत, तुमचं सरकार चोरून नेलं. त्यांनी फक्त सरकारच चोरलं नाहीतर, त्यानंतर प्रत्येक कामासाठी ४० टक्के कमिशन घेतलं,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. “कर्नाटक सरकार ४० टक्के कमिशनसाठी ओळखलं जाते. बेल्लारी भ्रष्टाचाराचे केंद्र आहे. त्यामुळे बेल्लारीत आता बदल झाला पाहिजे. फक्त निवडणुकीत नाहीतर, तुमच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे,” असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.