नवी दिल्ली: जगासह देशात गोंधळ उडवलेल्या पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला असल्याचे दिसत आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात पेगॅसस प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज 14 प्रमुख विरोधी पक्षांना सकाळी ब्रेकफास्ट साठी आमंत्रित केलं आहे.
या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ च्या माध्यमातून राहुल गांधी आज 100 हून अधिक खासदारांशी चर्चा करणार असून त्यामध्ये केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारी सुरु आहे. राहुल गांधींच्या या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ चे आयोजन संसदेतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलं असून त्यानंतर विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
दरम्यान, इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या डेटाबेसमधून उघडकीस आलेल्या माहितीत ५० हजार मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. त्यातील ३०० मोबाइल क्रमांक भारतीय आहेत. हे मोबाइल क्रमांक वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांचे असल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.