नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचली होती. त्यानंतर आता सध्या यात्रेत 9 दिवसांचा ब्रेक आहे. तर, 3 जानेवारीला ती पुन्हा कश्मिरी गेटपासून सुरू होईल आणि प्रवास पूर्ण करेल. यावेळी अनेक बडे राजकीय नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, ‘भारत जोडो यात्रे’ पूर्वीच राहुल गांधींनी आपल्या मनातील एक इच्छा बोलून दाखवली आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी आपल्या लग्नासंदर्भात पहिल्यांदाच आपले मन मोकळे केले. ‘आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या गुणांचा मिलाफ असलेली मुलगी मला लग्नासाठी हवी आहे’. असं स्वतः राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी यांना आपल्या आजी (इंदिरा गांधी) सोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘माझी आजी माझ्या आयुष्यातील प्रेम होती. ती माझी दुसरी आई होती’. पुढे बोलताना राहुल गांधी यांना ‘इंदिरा गांधींचे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का? असं देखील विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, “मला अशी मुलगी हवी आहे जिच्यात माझ्या आजीच्या आणि आईच्या गुणांचे एकत्रिकरण असेल’. असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.