अहमदाबाद –कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. गुजरातमधील जनतेला कॉंग्रेसकडे आकर्षित करण्याच्या उद्देशातून त्यांनी अनेक आश्वासनांची खैरात केली. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, 500 रूपयांत गॅस सिलिंडर, 10 लाख नोकऱ्यांची उपलब्धता आदींचा समावेश आहे.
गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसला सज्ज करण्याच्या निर्धाराने राहुल यांनी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी सध्या राजकारण तापवणाऱ्या मोफत सुविधा आणि वस्तूंच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत अनेक आश्वासने दिली.
कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास गुजरातमधील जनतेला काय-काय दिले जाईल याची यादीच जणू त्यांनी जाहीर केली. भाजप केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करेल. पण, कॉंग्रेस शेतकऱ्यांचे 3 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करेल. आम्ही तरूणांना नोकऱ्या मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करू. शेतकऱ्यांना मोफत वीज आणि मुलींना मोफत शिक्षण मिळेल.
आम्हाला महागाई आणि बेरोजगारी संपुष्टात आणायची आहे. सध्या 1 हजार रूपयांना मिळणारा गॅस सिलिंडर निम्म्या दरात उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही राहुल यांनी दिली. तसेच, विविध मुद्यांवरून त्यांनी सत्तारूढ भाजपवर टीकेची झोड उठवली.