राहुल गांधींविरोधात भाजपचा उमेदवार ठरला; अमित शहांकडून घोषणा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तरप्रदेशातील अमेठी या आपल्या पारंपरिक मतदारसंघासहच केरळमधील वायनाड मतदारसंघातून देखील उमेदवारी जाहीर करणार आहेत. केरळ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी केरळातून निवडणूक लढवावी अशी मागणी लावून धरल्याने काँग्रेस हायकमांडकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून कालच पक्षाचे जेष्ठ नेते ए के अँटनी यांनी याबाबत अधिकृत घोषणा देखील केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने आता हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्वाचा बनला आहे. दरम्यान, आज राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाड येथून भाजपतर्फे उमेदवार देण्यात आला असून याबाबतची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांनी वायनाडच्या उमेदवाराबाबत माहिती दिली असून येथून एनडीएतर्फे केरळातील प्रादेशिक पक्ष असणाऱ्या भारत धर्म जन सेनेचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपतर्फे खेळण्यात आलेल्या या राजकीय खेळीद्वारे राहुल गांधी यांना आता स्थानिक युवा उमेदवारासोबत दोन हात करावे लागणार आहेत. तुषार वेल्लापल्ली यांच्या उमेदवारीबाबत ट्विटरवरून माहिती देताना अमित शहा यांनी केरळमध्ये एनडीए एक भक्कम राजकीय पर्याय म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.