बंगळुरू – काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अशिक्षित असल्याचा दावा केल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद झाला आहे. आता भाजपकडून वादग्रस्त विधान करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेसनेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असल्याचं वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ते ड्रग्जची तस्करदेखील करत आहेत. हे मीडियात आले होते. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नसल्याचे नलीन कुमार कटील यांनी म्हटले आहे.
या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस आक्रमक झालं आहे. नलीन कुमार कटील यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी, मागणी काँग्रेसनेते डी. शिवकुमार यांनी केली आहे. राजकारणात विरोधकांसोबत आदराने वागलं पाहिजे, असं मी कालच म्हटलं होतं. भाजप माझ्या मताशी सहमत असेल तर ते राहुल गांधी यांच्याविषयीच्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष माफी मागतील, असंही डी. शिवकुमार यांनी नमूद केलं.