मुंबई – राज्य सरकार दरवर्षी फ्रांस मध्ये होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या मार्केट मध्ये 3 मराठी चित्रपट पाठवत असते. गेल्यावर्षी यामध्ये खंड पडला होता. यावेळी मात्र राज्य सरकार कान्सला 2 चित्रपट पाठवत असल्याचे जमले जात आहे.
यापैकी एक चित्रपट म्हणजे, “मी वसंतराव’ या चित्रपटाची निवड झाली असून, या संदर्भातील अधिकृत घोषणा प्रसिध्द शास्त्रीय गायक ‘राहुल देशपांडे’ यांनी सोशल मीडियावर केली आहे. तर दुसरा चित्रपट कोणता ते अद्याप कळलेलं नाही.
View this post on Instagram
“मी वसंतराव’ हा चित्रपट निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित लॉकडाउनमुळे प्रदर्शित होऊ शकलेला नाही. जेव्हा चित्रपट गृह सुरु होतील तेव्हा लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दरम्यान, राहुल यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर चाहत्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
राहुल देशपांडे सह अनीता दाते, निपुण धर्माधिकारी, कौमुदी वलोकर, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ या सारखे तगडे कलाकार यामध्ये असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.
आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नाविण्य ते प्रेक्षकांसमोर सादर करत आहे.
आता ‘मी वसंतराव’ या चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे आजोबांचीच वसंतराव देशपांडे यांची भूमिका स्वतःहा राहुल देशपांडे साकारत असल्याने प्रेक्षकांसाठी हा दुग्धशर्करा योग असेल हे नक्की.