वडापुरी -सुसंस्कृत मराठी माणसाने तसेच छत्रपती शिवरायांचे संस्कार झालेल्या माणसाने दडपशाहीच्या व हुकूमशाहीच्या व पैसे वाटणाच्या संस्कृतीच्या विरोधात कसब्याचा निकाल दिला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गणात गाव भेट दौऱ्यानिमित्त त्या भाटनिमगाव येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात आपले मत व्यक्त केले राहुल कलाटे यांना आम्ही विनंती केली होती; परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. अन्यथा आज चिंचवडची परिस्थिती वेगळी असती, मताचे विभाजन झाले तरच भारतीय जनता पार्टी निवडून येते याचा अर्थ सर्वसामान्य मायबाप जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात व देशात महागाई व बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईमुळे जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे, तो रोष मतपेटीतून व्यक्त होत आहे.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, प्रतापराव पाटील, सचिन सपकाळ, प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शुभम निंबाळकर, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, रवींद्र शिंदे, श्रीमंत खबाले, अशोक भोसले, समाधान खबाले, महादेव खबाले, पोलीस पाटील स्मिता शिंदे, ग्रामसेवक निलेश यादव, शरद गवळी, मुकेश साळुंखे आदि उपस्थित होते.