- श्वान दंशाचे 11 महिन्यांत साडेआठशे जणांवर उपचार
– रामकुमार आगरवाल
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील जिल्हा परिषद परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जानेवारी ते नोव्हेंबरअखेर अर्थात 11 महिन्यांत सर्वाधिक म्हणजे 842 रुग्णांनी कुत्रा चावल्यानंतर उपचारार्थ इंजेक्शन घेत उपचार “गुणकारी’ ठरत आहे.
तीर्थक्षेत्र देहूगाव येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी असून, गरोदर माताचे उपचार आणि आरोग्य विषयक शासनाच्या जनजागृती यासह विविध प्राथमिक उपचार रुग्णांवर केले जाते. करोना काळ वगळता अन्य वेळेस सुमारे प्रतिदिन साडेतीनशे ते चारशे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात होते. करोना काळातही रुग्णांवरील उपचार तसेच जनजागृती करण्यामध्ये या “पीएचसी’चा मोठा वाटा आहे.
भटकी कुत्री चावल्यानंतर कुत्र्याच्या लाळीमुळे रेबीज नावाचा रोग होण्याची भीती असते. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्याना ही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसांत दिसू लागतात.
भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता ती चावल्यानंतर उपचारार्थ इंजेक्शन घेण्यासाठी देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे “पीएचसी’मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही रुग्णसंख्या जानेवारी ते नोव्हेंबरअखेर 842 झाले आहे.
कुत्रे चावल्यानंतर जखमेसाठी इंजेक्शन घ्यावयाचे झाल्यास खुल्या बाजारात या इंजेक्शनसाठी साडेतीनशे ते चारशे रुपये मोजावे लागतात. त्यामुळे देहूतील पीएचसीमध्ये पाच रुपये नाममात्र शुल्कामध्ये 24 तास उपलब्ध होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर
महिना रुग्णसंख्या
जानेवारी- 126
फेब्रुवारी- 118
मार्च- 91
एप्रिल- 77
मे- 64
जून- 61
जुलै-56
ऑगस्ट- 67
सप्टेंबर- 72
ऑक्टोबर- 86
नोव्हेंबर -110
एकूण -842
कुत्रा चावल्यास उपचारार्थ पर्याय
कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर कापड बांधू नका. ती जखम मोकळी ठेवा. घरी अल्कोहल असल्यास किंवा पाण्याने जखम स्वच्छ करा. त्यामधील ऍन्टिसेप्टिक घटक परिणामकारक ठरतात. लाळ किंवा धूळ, माती स्वच्छ करण्यास मदत होते. कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानुसार इंजेक्शन घ्या. यामुळे इंफेक्शन रोखण्यास मदत होते.रेबीज रोखण्यासाठी इंजेक्शन आणि इम्युनोग्लोबुलिन हे अधिक योग्य उपचार आहेत. रेबीज हे व्हायरल इंफेक्शन आहे. त्यावर केवळ ऍन्टी बॅक्टेरियल लोशन लावून फायद्याचे नाही. ऍन्टिसेप्टीकमुळे इंफेक्शन अधिक वाढू नये म्हणून काळजी घेतली जाऊ शकते. परंतु शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण उपचाराभावी काही वेळेस कुत्रा चावणे हे जीवघेणेही ठरू शकते. त्यामुळे त्याची तीव्रता आणि धोका ओळखण्यासाठी वैद्यकीय उपचार गरजेची आहे.
चाकण, खालुंब्रे, म्हाळुंगे, सुदुंबरे, शिंदे वासुली, सांगुर्डी, येलवाडी, इंदोरी, तळेगाव, आळंदी, पिंपरी-चिंचवड हद्दीतील चिखली, तळवडे, रावेत, किवळे, विकासनगर, साईनगर यासह देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळा, चिंचोली, देहूरोड, मामुर्डी, शेलारवाडी, कोटेश्वरवाडी परिसरातून रुग्ण येत आहेत. त्यामुळे सर्व रुग्णांवर योग्य उपचार केल्याने रुग्णांना उपचार मिळत आहेत.
– डॉ. रणजित कांबळे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देहूगाव.