शिक्षण आयुक्‍तांकडे गाऱ्हाण्यांची जंत्री

शिक्षक भरती प्रक्रिया : यादीत चुका झाल्याचा उमेदवारांचा आरोप

पुणे – पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर गर्दी करण्याचा धडाका लावला आहे.

राज्यात आठ वर्षानंतर शिक्षक भरती होत असल्याने प्रत्येक उमेदवारांला आपल्याला नोकरी मिळावीच असा आग्रह धरण्यात येऊ लागला आहे. यासाठी उमेदवारांनी गटा-गटानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या भेट घेणे, आंदोलने करणे यावर भर दिला आहे. मुलाखतीशिवाय उमेदवारांना शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी देण्यासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समांतर आरक्षणाच्या पात्र उमेदवारांना संधी मिळालेली नाही. यादीत खूप चुकाच झाल्या त्या दुरुस्त करण्यात याव्यात. काही उमेदवारांना निवड यादीनुसार मिळालेली शाळा सोयीची वाटत नसल्याने त्यांना शाळा बदल करुन हवी आहे. खासगी शाळांमध्ये मुलाखतीसह होणारी भरती प्रक्रिया सुरु करावी या मागणीसाठी सोमवारी (दि.9) सुमारे 200 उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. या गर्दीने थेट शिक्षण आयुक्तांकडे धाव घेतली व सर्वांनीच त्यांना भेटण्यासाठी आग्रह धरला. अखेर पोलिसांना बोलावून गर्दी पांगविण्यात आली. शिक्षण आयुक्तांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तक्रार अर्जांवर सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे, असे आश्‍वासन त्यांनी उमेदवारांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.