पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धा : नौशाद शेखची दमदार शतकी खेळी
पुणे – पहिल्या दिवसअखेर नौशाद शेख याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघासमोर 351 धावांचे आव्हान उभे केले आहे. पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु झालेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचा पहिला सलामीचा दोन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजीत व नंतर गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत आज वर्चस्व गाजवले.
क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना 38.4 षटकांत 351 धावापर्यंत मजल मारली. 10 गडी बाद झाल्याने क्लब ऑफ महाराष्ट्रची अंतिम धावसंख्या 301 धावा (वजा 50 धावा) झाली. यात नौशाद शेखने धडाकेबाज फलंदाजी करत 85 चेंडूचा सामना करताना 11 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 127 धावा चोपल्या. नौशादला सुजित उबाळे 86 धावा, यश क्षीरसागर 47 धावा, देवदत्त नातू 43 धावा करून सुरेख साथ दिली. व्हेरॉककडून शुभम तैस्वालने 51 धावात 4 गडी, तर मनोज यादव (58-2), विशाल गीते (66-2), कार्तिक पिल्ले (51-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पहिल्या डावात 40 षटकांत 351 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या व्हेरॉक संघाने आज दिवसअखेर 22 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने 42 चेंडूत 4 चौकारांच्या साहाय्याने 53 धावांची संयमपूर्ण खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून निकित धुमाळ (29-1), नौशाद शेख (24-1), प्रज्वल गुंड (32-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. व्हेरॉक संघाचा विशाल गीते 35 धावांवर, तर उत्कर्ष अगरवाल 36 धावांवर खेळत आहे.
व्हेरॉक संघाचा पहिल्या डावातील 18 षटकांचा खेळ बाकी असून 196 धावांनी पिछाडीवर आहेत. स्पर्धेचे उदघाटन गोल्डफिल्ड ग्रुपचे अनिल छाजेड आणि अभिजित चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रणजित पांडे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 38.4 षटकांत सर्वबाद 351 (351-50धावा = 301धावा) (नौशाद शेख 127, सुजित उबाळे 86, यश क्षीरसागर 47, देवदत्त नातू 43, शुभम तैस्वाल 6-51-4, मनोज यादव 6.4-58-2, विशाल गीते 8-66-2, कार्तिक पिल्ले 7-51-2) वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी : 22 षटकांत 4 बाद 155 (ऋतुराज गायकवाड 53, विशाल गीते नाबाद 35, उत्कर्ष अगरवाल नाबाद 36, निकित धुमाळ 4-29-1, नौशाद शेख 5-24-1, प्रज्वल गुंड 4-32-1).