कोलंबो – श्रीलंकेकडील परकीय चलनाची गंगाजळी घटल्याने मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ श्रीलंकन सरकार आणि नागरिकांवर आली आहे. श्रीलंकेकडे असणारे परकीय चलन इंधन तेल आणि इतर कारणांवर खर्च करावे लागत असल्याने देशातील परीक्षा कागदाअभावी लांबणीवर टाकण्याची नामुष्की ओढावली आहे.
यामुळे जवळपास 45 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे गेल्या आहेत. पेपर आयात करण्यासाठी परकीय चलन शिल्लक नसल्याने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंका 1948 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा इतकी वाईट स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेतील पश्चिम प्रांताच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. परीक्षेसाठी कागद उपलब्ध न झाल्यास 45 लाख विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आहे.
श्रीलंकेवर सध्या 6.9 अब्ज अमेरिकेन डॉलरचे कर्ज आहे. ते कर्ज या वर्षी परतफेड करण्याची गरज आहे. तर, श्रीलंकेकडील परकीय चलन 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. आर्थिक संकटामळे श्रीलंकेत किराणा माल, पेट्रोल डिझेल, दूध आणि साखर आणि तांदळाच्या खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. श्रीलंकेने काही दिवसांपूर्वी चीनकडे मदतीसाठी विनंती केली होती. मात्र, श्रीलंकेच्या विनंतीला चीनने अद्याप प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे.