पुसेगाव – दलित वस्तीत शासकीय व सार्वत्रिक जागेत घर, बाथरूम, पत्र्याचे शेड व शौचालय बांधून अतिक्रमण केल्याप्रकरणी पुसेगाव (ता. खटाव) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजय कृष्णा मसणे यांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ज-3) व कलम (16-2) अनव्ये अपात्र ठरवले आहे. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा घनश्याम मसणे यांनी तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवाजी वार्ड क्रमांक एकमधून निवडून आलेले विजय मसणे हे अनुसूचित जाती वर्गातून पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाले. त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर मिळकतमधील पुर्वेकडील जागेत सरकारी रस्त्यावर 12 बाय 10 फुटाच्या दोन खोल्या तसेच जुनी ग्रामपंचायत ते मरीआई मंदिर या सार्वजनिक रस्त्यावर चार बाय 10 फुटाचे अतिक्रमण करून बाथरूम व शौचालय तसेच पत्र्याचे शेड उभे केले आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच भूमी अभिलेख खात्याच्या उपअधिक्षकांच्या अहवालानुसार सिटी सर्व्हे नंबर 841 चे क्षेत्र रस्त्याच्या हद्दीत आले असून शासनाच्या तसेच सार्वजनिक मालमत्तेवर आणि जागेत विद्यमान सरपंच विजय मसणे यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. शोभा मसणे यांनी याबाबत 27 जानेवारी 2023 रोजी या अतिक्रमण विरोधात शासनाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार दलित वस्तीमधून जाणाऱ्या लक्ष्मी मंदिर ते मातंग वस्ती या रस्त्याला शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मंजुरी देण्यात आली होती तसेच ग्रामपंचायतीकडे निधीही वर्ग करण्यात आला होता. सदर रस्ता व्हावा यासाठी चारवेळा ग्रामपंचायतीत ठरावही झाला होता. हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी दलित वस्तीतील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात विचारणाही केली होती.
मात्र या जागेवर विद्यमान सरपंच विजय मसणे यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता करता येणे शक्य नव्हते. विद्यमान सरपंचांनी शासकीय जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करत कायमस्वरूपी बांधकाम करून त्याचा वापर केला, रस्ता करण्यास विरोध केला, निवडणुकीच्या वेळी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गावच्या अहिताचे काम केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुसेगावचे सरपंच विजय कृष्णा मसणे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 1 (ज-3)व कलम (16-2)अनव्ये अपात्र ठरवले आहे.