पुसेगाव – बुध, ता. खटाव येथील टपाल कार्यालय चोरट्यांनी काल (दि. 19) रात्री फोडून तिजोरीच पळवली. या तिजोरीत महत्त्वाच्या कागदपत्रांसह 67 हजार 500 रुपयांची रोकड होती. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत सबपोस्टमास्तर समीर सलीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी शुक्रवारी (दि. 19) रात्री बुध येथील टपाल कार्यालय फोडून, लोखंडी तिजोरी पळवून नेली. तिजोरीत 67 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, सहा हजार 106 रुपये किमतीचे पोस्टल स्टॅम्प्स आणि इंडियन पोस्टल ऑर्डर्स होत्या. चोरट्यांचा माग काढण्यासाठी सातारा येथून श्वानपथकाला बोलावण्यात आले.
श्वानाने टपाल कार्यालयापासून केवळ तीनशे ते चारशे मीटरपर्यंत माग काढला. चोरट्यांनी वाहनावरून तिजोरी नेली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. शासकीय कार्यालयात झालेल्या या चोरीचा लवकरात लवकर छडा लावू, असा विश्वास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे-पाटील यांनी व्यक्त केला. सहाय्यक फोजदर चंद्रहार खाडे तपास करत आहेत.