बेल्हे -पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील चाहुर मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाहुर मळ्यात एका घोड्याचा बिबट्याने शुक्रवारी (दि. 24) सकाळी फडशा पडला होता. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्याच दिवशी चाहुर माळ्यात वन विभागाने पिंजरा लावला. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. 24) रात्री 8 ते 9 वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला.
या बिबट्याने गेल्या 15 दिवसांपासून येथील परिसरात धुमाकूळ घातला होता. जेरबंद झालेल्या बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रामध्ये करण्यात आली असल्याची माहिती पारगावचे वनरक्षक के. एस. नायकवाडी यांनी दिली. भर दिवसा या ठिकाणी लोकांना बिबट्या दर्शन देत होता.
शुक्रवारी सकाळी एका घोड्याचा फडशा याच बिबट्याने पाडला होता. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये असणारे भीतीच सावट कमी होणार असल्याचे दिसून येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डुकरे, गुलाब ठुबे, प्रशांत तट्टू, राजेंद्र डुकरे, सचिन डुकरे या ग्रामस्थांची मदत वनविभागाला झाली.
जुन्नर तालुका बिबट्या प्रवणक्षेत्र असल्याने दररोज कोणत्या ना कोणत्या गावामध्ये बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे, त्यामुळे तालुका सध्या बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे जाणवते. या परिसरात नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून या बिबट्याचा माणसांवरही हल्ला होण्याची शक्यता आहे.
सध्या रब्बी हंगाम जोमात आला असल्याने त्याची निगा राखाण्यासाठी व पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री-अपरात्री घराबाहेर पडत आहे; परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे. बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या तणावात शेतीची कामे करत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्वरीत पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून वनखात्याकडे होत आहे.