वाई-पाचगणीकरांनी केला पसरणी घाट स्वच्छतेचा निर्धार
वाई – पाचगणी, महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे राज्य देशासह विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पसरणी घाटातून होणारी रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, काही स्थानिकांसह पर्यटक घाटामध्ये अस्वच्छता करतात.
घाटाच्या दुतर्फा प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, दारूच्या बाटल्यांचा खच पडत असल्याने घाटात अस्वच्छता निर्माण होवून पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे, या जाणीवेतून पाचगणी व वाई पर्यावरण प्रेमींनी 13 किमी लांबीचा पसरणी घाट स्वच्छ करुन एक आगळावेगळा उपक्रमा राबविला आहे. या स्वच्छता मोहिमेत वाई, पाचगणी नगरपालिका, सामाजिक, शैक्षणिक संस्था, पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, महिन्यातून एकदा या घाटाची स्वच्छता करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे.
पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना जेवढे पर्यटक जिल्हा, राज्यभरातून येतात तेवढे देशातीर इतर राज्यातील विशेषत: परदेशी पर्यटकही भेटी देतात. पाचगणी-महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्ता हा पसरणी घाटातूनच आहे. या घाटरस्त्यावर गेल्या काही वर्षांमध्ये काही स्थानिक टवाळखोर युवक तसेच पर्यटकांकडूनही घाण केली जात आहे. खाद्यपदार्थांच्या पिशव्या तसेच मद्यपान करुन दारुच्या बाटल्या रस्त्याकडेला टाकल्या जात असल्याने घाटरस्त्याला अस्वच्छतेचा विळखाच पडत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाई-पाचगणी करांनी या घाटाची स्वच्छता करुन आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता घाटात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या सर्व ग्रुपने हातात झाडू व पोती घेवून घाट रस्ता स्वच्छ केला.
स्वच्छता मोहिमेत पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वाई पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार, उपाध्यक्ष धनंजय घोडके, सचिव पी. एस. भिलारे, मानवता सोशल फौंडेशनचे पोपटलाल ओसवाल, प्रवीणा ओसवाल, स्वप्निल मांढरे, सचिन मानकुंबरे, नगरपालिकेचे नगरसेवक भारत खामकर, शिवसह्याद्री करिअर ऍकॅडमीचे राजेंद्र खरात, ज्वेलर असोशियेषनचे विजय लष्करे, ऍड. रवींद्र भोसले, अशोकराव सरकाळे, पाचगणी येथील बेलएर हॉस्पिटलच्या व्यवस्थापक जितीन जोसेफ, उपप्राचार्य प्रा. अमला झावियर, अनिता डमारे, आर.एल. तीफनी, अभियानात नर्सिंग विभागाच्या 140 विद्यार्थिनी, वाई येथील शिवसह्याद्री करिअर ऍकॅडमीचे 30 विद्यार्थी, ऍक्सीस बॅंकचे 18 कर्मचारी, व वाई- पाचगणी येथील अनेक पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेवून तीन ट्रॉली कचरा गोळा करून विल्हेवाट लावली.
स्वच्छतेचे महत्व खूप वाढले असून सार्वजनिक स्वच्छता या विषयाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वैयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूक असणारे नागरिक सार्वजनिक स्वच्छतेविषयी बेजबाबदार पणाने वागताना दिसत आहेत. यासाठी सर्वच स्तरावर व्यापक जनजागृती होणे काळाची गरज आहे. आम्ही पसरणी घाट स्वच्छतेचा संकल्प केला असून महिन्यातून एकदा घाट स्वच्छता अभियान हाती घेणार आहे.
– लक्ष्मीताई कऱ्हाडकर, नगराध्यक्षा – पाचगणी नगरपालिका.