तिघांवर गुन्हा दाखल : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत
पिंपरी – कॉलेजमधील मित्र काही दिवस मेडिकल दुकानदार मित्राकडे मेडिकलसाठी औषध खरेदी-विक्री करीत होता. त्याने मेडिकलच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे घातक औषधांची खरेदी करून साठा केला. तसेच डॉक्टरांच्या परवानगीशिवाय औषध विक्रीदेखील केली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे.
श्रीराम बालाजी रुपनर (रा. थेरगाव, मूळ रा. लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गोविंद मनोहर पांचगे (रा. थेरगाव, मूळ रा. कर्नाटक) आणि सोपान माळी (रा. भुसावळ, जळगाव) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री यादव (वय 42) यांनी बुधवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्न व औषध विभागाने सदाशिव पेठ येथील कैलास इंटरप्रायझेस या घाऊक औषध दुकानाची औषधांच्या खरेदी विक्रीबाबत तपासणी केली. त्यानुसार फिर्यादी यादव यांनी पुनावळे मेडिकल (पुनावळे) या मेडिकल दुकानात तपासणी केली असता औषधाची खरेदी केली नसल्याचे समोर आले. कैलास इंटरप्रायझेस या घाऊक औषधविक्री करणाऱ्या दुकानात पुनावळे मेडिकलच्या नावाने विक्री परवान्याची शिक्का मारलेली प्रत दिल्याचे दिसले. त्यानुसार या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्या वेळी त्यांचा मित्र आरोपी श्रीराम रुपनर याने त्याच्या गोविंदा पाचंगे याच्यासह मिळून पुनावळे मेडिकलच्या नावाने संबंधित औषधांची खरेदी केली असल्याचे निदर्शनास आले.
त्याचबरोबर शिवाजीनगर येथील आरती फार्मा या घाऊक औषधविक्री करणाऱ्या दुकानातदेखील आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरील औषधांची खरेदी केल्याचे आढळले. आरोपी औषध खरेदी विक्रीचे काम करत होता. तो दुकानाचे भागीदार शरद गीते यांचा कॉलेजमधील मित्र होता. अन्न व औषध प्रशासनाने आरोपीकडे चौकशी केली असता औषधाचा थेरगाव येथे साठा केल्याचे मान्य केले. तसेच त्याने काही औषधे भुसावळ येथील आरोपी सोपान माळी याला विकल्याचेही सांगितले. प्रशासनाने त्याच्याकडून 290 बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी तिघांवर भारतीय दंड विधानानुसार तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. रुपनर याला अटक केली असून, वाकड पोलीस तपास करीत आहेत.
हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास त्याचा औषध खाणाऱ्याच्या शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतो. यामुळे मतिभ्रम, बेशुद्ध होणे, हृदयाची गती कमी होऊ शकते. औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे बंधनकारक आहे.