वडगाव मावळ – मावळ तालुक्यात शेती विकास सोसायट्याकडुन इंद्रायणी भात खरेदी योजनेसाठी भात उत्पादक शेतकऱ्यांकडुन उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 350 टन भाताची खरेदी आली आहे. यामधून शेतकऱ्यांना 85 लाख रूपयांचे जागेवरच वाटप करण्यात आले आहेत.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांचे संकल्पनेतून हमीभावाने इंद्रायणी भात खरेदी ही योजना राबविली जात आहे. ही योजना मावळ तालुक्यातील शेती विकास सोसायट्यांच्या मार्फत राबविली जात आहे. त्याकरिता गावोगावी इंद्रायणी भात खरेदी केंद्र सुरू केलेली आहेत. तर शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत त्याच दिवशी पैसे देण्यात येत असल्याने शेतकरी समाधानी व आनंदी आहेत शेतकऱ्यांनी पिकविलेला भात यावर्षी प्रथमच शेती विकास सोसायट्याच्या मार्फत विकत घेतला जात आहे. भात प्रति किलो 24 रुपये किलो दराने खरेदी केला जात असल्याने शेतकरी आपला भात थेट सोसायट्यांच्या भात खरेदी केंद्रावर आणत आहेत.
भात खरेदीच्या पहिल्या टप्प्यात नवलाख उंबरे, ताजे, चिखलासे, सुदुंबरे, चावसर, उर्से, धामणे, वडेश्वर, निगडे, माळेगांव, बेबेड ओहळ, आढले व कार्ला या 13 सोसायट्यांनी भात खरेदी जोरात सुरू केलेली आहे.
भाताला उंच्चाकी दर
इंद्रायणी भात खरेदीचा सरकारी हमीभाव 20 रुपये 60 पैसे असुन शेतकरी सोसायट्या 24 रुपये प्रति किलो या उंच्चांकी दराने खरेदी केला जात आहे.यासाठी सचिव संजय ढोरे, धर्मा ठोंबरे, संभाजी केदारी, सुनील गाडे, रामदास पाठारे, गुलाब ढोरे, उमेश वाडेकर, अंकुश पिंपरकर, रविंद्र हिंगे, तुकाराम लोहोर, सचिन भानुसघरे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नीरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भात खरेदीचे काम सुरु आहे.