मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने आज जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात माफक वाढ केली आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. माहिती तंत्रज्ञान, बॅंका, वित्तीय संस्था, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 377 अंकांनी वाढून 60,663 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 150 अंकांनी म्हणजे 0.85 टक्क्यांनी वाढून 17,871 अंकावर बंद झाला.
परदेशात व्याजदरवाढ माफक होत असतानाच रिझर्व्ह बॅंकेने विकासदराला चालना देण्यासाठी व्याजदरात मापक वाढ केली आहे. महागाई 5.3% च्या जवळपास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आशावादी झाले असल्याचे दिसून आले. बजाज फायनान्स कंपनीचा शेअर आज तीन टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टायटन, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
तर लार्सन अँड ट्युबरो, भारती एअरटेल, ऍक्सिस बॅंक, कोटक बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली असल्याचे दिसून आले. रिझर्व्ह बॅंकेने यावर्षी विकास दर 7% सात टक्के राहील असे म्हटले आहे. तर पुढील वर्षी विकासदर 6.4% राहिला असे म्हटले आहे. हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, जपान, चीनचे शेअर बाजार निर्देशांक कमी झाले होते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून मात्र भारतात विक्री चालूच आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 2,559 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आगामी काळातही हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दरम्यानच्या काळात ही पोकळी भारतातील किरकोळ व संस्थागत गुंतवणूकदार भरून काढीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार काही प्रमाणात सावध राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.