बेलसर (निखिल जगताप) – पुरंदर तालुक्यातील महत्त्वाचे पीक म्हणून सीताफळ पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यामध्ये जवळपास चार हजार हेक्टरवर सीताफळ पिकाची लागवड आहे. चालू वर्षी अधिकच्या उष्णतेमुळे व पाऊस उशीर झाल्यामुळे सीताफळ फळधारणेसाठी अधिक अडचणी आल्या होत्या. दरम्यान, बाजारपेठेत पुरंदरच्या सीताफळाला सोन्याचा भाव म्हणजेच प्रति क्रेट 3100 रुपये असा विक्रमी भाव मिळत असल्याने उत्पादकांना सोन्याचे दिवस आले आहेत.
पुरंदर तालुक्याच्या अर्थकारणांमध्ये सीताफळ, अंजीर, टोमॅटो, डाळिंबाचा महत्त्वाचा वाटा आहे. यावर्षी सुरवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने तसेच जास्त उष्णतेमुळे बागेत फलधारणा कमी झाली त्यामुळे बाजारात मालाची आवक कमी होत आहे. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक प्रयत्न करून अधिक कष्टांनी फुलवलेल्या सीताफळ बागामुळे आज उत्पादक मालामाल झाले आहेत.
पुरंदर तालुक्यामध्ये सासवड, दिवे, वाघापूर, पिसर्वे, पारगाव तर इतर ठिकाणीही सीताफळ व इतर भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारपेठा उपलब्ध झालेले आहेत. वाहतूक खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांना यामध्ये अधिक फायदा मिळत आहे. तर स्थानिक बाजारपेठेत कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च होत नाही व मालाची रोख स्वरूपात विक्री होते; परंतु बदलत्या हवामानामुळे व अनिश्चित वातावरणामुळे सीताफळाची आवक घटली आहे. त्यामुळे उपलब्ध बाजारात उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.
तालुक्या सोबतच राज्यभरात सध्या सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी संशोधन केंद्र व विद्यापीठाद्वारे सीताफळाच्या वेगवेगळ्या जाती तयार करण्यात आल्या आहेत; मात्र तालुक्यातील पुर्वांपार फुले पुरंदर वाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळाला देशभरात प्रदेशात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे तालुक्यातील सीताफळ अनेक लघु व्यवसायांसाठी व प्रॉडक्ट बनवण्यासाठी जगभरात विशेष मागणी आहे बाहेर राज्यातही पुरंदरचे सिताफळ विशेष विक्री केले जाते.
एक सीताफळ 50 रुपयांना
तुषार झेंडे, शंकर झेंडे, विशाल तळेकर,तुषार काळे, गणेश काळे,सागर धुमाळ, बापू शेलार या व्यापाऱ्यांनी सर्वाधिक बोली लावत सीताफळ खरेदी केले. हा सर्व माल पॅंकिंग करत दिल्ली, कोलकत्ता व इतर राज्यात पाठवला जाईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले. या सर्व शेतकऱ्यांचे एक सीताफळ साधारण 50 रूपयांच्या आसपास विकले गेले त्यामुळे सीताफळ उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी उच्चांकी 1500 रुपये दर
मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान सिताफळ प्रति क्रेट उच्चांकी दर 1500 रुपये होता, परंतु अक्षरशः सद्यस्थितीला सिताफळ प्रती क्रेट मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट बाजार भावाने विकले जात आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी पूर्वीची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दिसत आहे.
ढुमेवाडीत दिवसात 10 लाखांची उलाढाल
दिवे(ढुमेवाडी) येथे नुकताच चालु झालेला बाजार हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. तालुक्यांमध्ये स्थानिक ठिकाणी बाजार भरून स्थानिक माल जागेवरच खरेदी केल्याने शेतकऱ्यांना अधिकचा खर्च वाचतो व नफा अधिक मिळत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठा महत्त्वाची आर्थिक केंद्रस्थाने बनली आहेत. ढुमेवाडी बाजारपेठेमध्ये पहिल्याच दिवशी दहा लाख रुपयांची उलाढाल झाली आहे त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारपेठ याबद्दल सकारात्मक आहेत असे दिसते.
इतर क्रेटला 2500 रुपये दर
राहुल बोरकर या शेतकऱ्याचे एक क्रेट 3100 रुपये (एक क्रेट 15 किलोचा तर 205 रुपये किलो) विकले गेले तर नवनाथ भापकर या शेतकऱ्याचे 3000 रुपयांत (किलोला 200 रुपये) एक क्रेट विकले गेले. तर इतर क्रेटला चांगल्या प्रतीच्या मालाला 2500 प्रति क्रेट बाजारभाव (किलोला 167) रुपये मिळाला आहे. बाजारपेठेत पुणे, मुंबई बाहेरिल राज्यातील व्यापारी खरेदी करण्यासाठी दाखल झाले आहेत.