पुणे – मोगॅम्बो खुश हुवा..! हा डायलॉग उच्चारला की आठवण होते ती म्हणजे, दिवंगत अभिनेते ‘अमरीश पुरी’ यांची. अभिनेता म्हणून अमरीश पुरी म्हणजे साधेपणा, कामातील वक्तशीरपणा याचा सुंदर मिलाफ, फिल्मी दुनियेत राहूनही ते अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. अशा या महानायकाची आज पुण्यतिथी आहे.
१९५३ साली अमरीश पुरी मुंबईत आले. पण अमरीश पुरी स्क्रीन टेस्टमध्ये अपात्र ठरवले जायचे. त्यांचं रंग रुप बघून त्यांना कोणी काम देत नव्हतं. फार दिवस भावाकडे ओझं नको म्हणून त्यांनी नोकरी करायला सुरूवात केली. कधीकाळी त्यांनी घरोघरी जाऊन माचिस विकली तर कधी कारकुनी कामं केली. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी केली.
काही वर्षांनी अमरीश पुरी यांची ओळख रंगमंचाचे सम्राट मानल्या जाणाऱ्या इब्राहिम अल्काझी यांच्याशी झाली. त्यानंतर पहिलं इंग्रजी नाटक अमरीश पुरी यांना मिळालं. तर १९६७ साली त्यांना मराठी सिनेमात पहिल्यांदा काम मिळालं. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याआधी १९७० मध्ये त्यांचा प्रेम पुजारी हा हिंदी सिनेमा आला. १९७० मध्ये म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर त्यांना रोल मिळू लागले मात्र त्यात फारसं काही करण्याची संधी त्यांना मिळाली नाही.
गोविंद निहलानी यांच्या अर्धसत्य सिनेमात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. इथूनच पुढे अमरीश पुरी पर्वाला सुरूवात झाली. कमर्शियल चित्रपटात अमरीश पुरी यांची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली ती १९८१ साली आलेल्या ‘हम पाँच’ या सिनेमानं. त्यानंतर आलेल्या ‘विधाता’ आणि ‘हिरो’ या चित्रपटांनी त्यांना खलनायक म्हणून ओळख दिली. अनेक खलनायक त्यावेळी स्पर्धेत होते पण अमरीश पुरी यांच्यासोर एकही टिकला नाही. मिस्टर इंडिया मधल्या मोगॅम्बोनं अमरीश पुरी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं.
८० आणि ९० च्या दशकात अमरीश पुरी यांचे एकामागोमाग अनेक हिट सिनेमे आले. फूल और कांटे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, राम लखन, सौदागर, करण अर्जुन, घायल, गदर, दामिनी, आक्रोश, अर्द्धसत्य, भूमिका, चाची ४२०, घातक, हीरो, कोयला, मंथन, मेरी जंग, मि. इण्डिया, मुस्कराहट, नगीना, फूल और कांटे, राम लखन, ताल, त्रिदेव, विधाता अशी एक ना अनेक नाव घेता येतील. अमरीश पुरी यांचा अभिनय इतका प्रभावी होता की बायका त्यांचा अक्षरशः द्वेष करायच्या. अमरीश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.