नवी दिल्ली – कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर दीड महिन्यांपासून आंदोलन करत आहे. यासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले आहे. अशातच एका भाजप खासदाराने शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे आंदोलन फसवे असून शेतकरी पैसे घेऊन आंदोलन करत आहेत, असा दावा भाजप खासदाराकडून करण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
कर्नाटकातील कोलार येथील भाजप खासदार मुनीस्वामी यांनी म्हंटले कि, दिल्लीतील आंदोलनात बहुतांश दलाल आहेत किंवा तोतये शेतकरी आहेत. या आंदोलनादरम्यान शेतकरी पिझ्झा, बर्गर आणि केएफसीमधून ऑर्डर करून जेवत आहेत. आंदोलन सुरू असलेल्या भागात एक जीमही सुरू करण्यात आले आहे. आता हे नाटक बंद झाले पाहिजे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
दरम्यान, जर कृषी कायद्यांना स्थगिती देण्यास सरकार तयार नसेल तर आम्ही स्थगिती देऊ, असे सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला खडसावले. कृषी विधेयकांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अयोग्यप्रकारे हाताळल्याचा ठपकाही सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारवर ठेवला.
ज्या पद्धतीने शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटी केल्या जात आहेत, ते अतिशय निराशाजनक होते. या आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी माजी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त केली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.