-->

वाढते अपघात: उपाययोजनांबाबत पुणे प्रशासनाच ‘न्यूट्रल’

महामार्गावरील वाढत्या अपघातांबद्दल अभ्यासकांचे मत

पुणे – नऱ्हे गाव, नवले पुलादरम्यान सातत्याने अपघात होत आहेत. बहुतांश अपघातांमागे अतिवेग आणि “न्यूट्रल’मध्ये वाहन चालवणे ही प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा निष्काळजीपणा स्वत:सह इतरांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची प्रमुख कारणे लक्षात घेत, पायाभूत सुविधांकडेच लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे मत वाहतूक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

मागील काही दिवसांपासून नऱ्हे गाव, नवले पूल, बंगळुरू हाय-वेवर अपघातांची मालिका सुरू आहे. अपघातांमुळे शहरालगतचे महामार्ग मृत्यूचे सापळे होत असून, यात जीवितहानीदेखील होत आहे. कात्रज नवीन बोगद्याकडून येणाऱ्या रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातांची नोंद घेत यापूर्वी देखील पोलिसांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे विविध सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे पुन्हा उपाययोजना करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. मात्र, महामार्गाबाबत रम्बलर्स, साइन बोर्ड, रस्त्याची रचना आदीसंदर्भात ठोस उपाययोजना गरजेचे असल्याचे मत वाहतूक अभ्यासकांनी दैनिक “प्रभात’कडे व्यक्त केले.

बंगळुरू-मुंबई महामार्ग अपघातांचा घटनाक्रम
1. कात्रज बोगद्याकडून नऱ्हेकडे जाताना भूमकर पुलावर पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने धडक दिली. यात राजू भगवान मुजालदे (32) आणि अजय भगवान मुजालदे (28 दोघेही रा.ता.राजापूर, जि.बडवाणी,मध्यप्रदेश) या भावंडांचा मृत्यू झाला.
2. पहिल्या अपघात स्थळाच्या काही अंतरावर स्पेअरपार्टची वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटला. यात ट्रकचालक गणेश कैलास भाडोले (30, रा.मध्यप्रदेश) जखमी झाला.
3. वरील अपघातांची माहिती घेण्यासाठी ग्रामीण पोलीस जात होते. या वाहनाला भरधाव कंटेनरने उडवले. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून, सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कदम हे किरकोळ जखमी आहेत.
4. नवीन कात्रज बोगद्याजवळ दरी पुलाकडून साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रिक्षेला मागील ट्रकने धडक दिल्याने ती पुढील ट्रकला धडकली. यामधून दोन महिन्यांचे बालक व तिच्या आईची सुटका करण्यात आली. राजेंद्र उत्तम जाधव (32, रिक्षा चालक, रा. अगासवाडी, ता. माण), सोनाली राजेंद्र जाधव (25), यश जाधव (11 महिने) हे किरकोळ जखमी आहेत.
5. इर्टिंगा कार आणि ट्रक एकमेकांना घासून गेल्याने अपघात झाला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले.

बोगद्यानंतर तीव्र उतार आहे. त्यामुळे अनेक चालक “न्यूट्रल’मध्ये वाहन चालवतात. येथे इंजिनिअरिंग फॉरमॅट’संदर्भात काम आवश्‍यक आहे. वाहनचालक ऍलर्ट राहण्यासाठी रम्बलर्स स्ट्रीपची रांग केल्यास वाहनाचा स्पीड होतो. महामार्गावर पिक्‍टोरियलमध्ये साइन बोर्ड आवश्‍यक आहेत. “ब्लॅकस्पॉट’च्या “पॅच’मध्ये पोलीस बंदोबस्त असावा.
– तन्मय पेंडसे, वाहतूक अभ्यासक


भारतात प्रामुख्याने अतिवेगामुळे अधिक अपघात होतात. त्यातील बहुतांश प्राणांतिक असतात. रस्त्याची रचना, आराखडा, वाहनांची स्थिती, नियमांची अंमलबजावणीवर भर असावा. मोटार वाहन कायद्याबाबत राज्य सरकारने आदेश लवकर जाहीर करावेत. यामुळे किमान अधिक दंडाच्या भीतीमुळे तरी वाहनचालक नियमांचे पालन करतील. यामुळे काही अंशी अपेक्षित फरक पडू शकतो.
– संदीप गायकवाड, परिसर संस्था


शहरातून जाणाऱ्या महामार्गाची शहरी रस्त्यांनुसार रचना केली पाहिजे. त्यानुसार अवजड वाहनांना वेगाचे बंधन आवश्‍यक असेल. चारचाकी-दुचाकी वाहने, पादचाऱ्यांचादेखील अपघात होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सर्वांगीण विचार होऊन रस्त्याची रचना आणि त्यासंबंधीच्या अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे गरजेचे आहे.
– प्रांजली देशपांडे, वाहतूक अभ्यासक


सोमवारच्या अपघातांनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांबरोबर पुन्हा कात्रज नवीन बोगद्यापासून पाच किलोमीटरचे सर्वेक्षण केले. यापूर्वीच्या अपघातांनंतर महामार्ग अधिकाऱ्यांना 25 सूचना केल्या होत्या. त्याचा सातत्याने पाठपुरावा करुन त्यांची पूर्तता करुन घेण्यात आली. आता पुन्हा एकदा अतिरीक्त उपाययोजना सांगून त्याची पूर्तता करण्याची सूचना दिली आहे. येथे जड वाहनांचे अपघात रस्त्यावरील तीव्र उतारामुळे होताना दिसतात. महामार्ग असल्याने तेथे स्पीड ब्रेकर्स लावता येत नाहीत. मात्र रंबलर्सच्या संख्या वाढवून तसेच वेग मर्यादेच्या बोर्डाची संख्या वाढवून वाहनांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
– राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक पोलीस 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.