मुंबई – कुलदीप यादव, ललित यादव व अक्सर पटेल यांच्या फिरकीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा डाव 20 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आणला.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सुरुवातीला वेगवान गोलंदाज खलिल अहमदने तर नंतर फिरकी त्रिकुट कुलदीप, ललित व अक्सरने सार्थ ठरवला.
सलामीवीर कर्णधार मयंक आग्रवालने धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र, त्याला समोरून चांगली साथ लाभली नाही. तोदेखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 15 चेंडूत 4 चौकार फटकावून 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंजाबचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
जीतेश शर्माने आपल्या उपयुक्त 32 धावांच्या खेळीत 23 चेंडूत 5 चौकार फटकावले. त्यानंतर तळात शाहरुख खान व राहुल चहने प्रत्येकी 12 धावांची खेळी केली व संघाला शतकी मजल मारून दिली. दिल्लीच्या कुलदीप, ललित, अक्सर व अहमद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. मुस्तफिजूर रेहमानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत सर्वबाद 115 धावा. (जितेश शर्मा 32, मयंक आग्रवाल 24, अक्सर पटेल 2-10, ललित यादव 2-11, खलिल अहमद 2-21, कुलदीप यादव 2-24, मुस्तफिजूर रेहमान 1-28).