नवी दिल्ली – निवडणूकीचे वारे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जोरात सुरु आहेत. प्रत्येक पक्ष एकमेकांवर आगपाखड करण्यात मग्न आहे. एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असल्याची नवीन योजना जाहीर केली. तर दुसरीकडे कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्ष पंजाब लोक कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दल (युनायटेड) सोबत युती केली आहे. त्याचवेळी आप आणि कॉंग्रेसही रिंगणात आहेत. यामुळे पंजाब निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येते.
पंजाबमधील सर्व 117 विधानसभा जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी आतापर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी आणि महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असून, महिलांना बळ देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 4 दिवसांनी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप, कॉंग्रेस, आप आणि अकाली दल हे प्रमुख पक्ष पूर्ण जोमाने रिंगणात आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कुमार विश्वास म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेहमीच खलिस्तानच्या समर्थनात आहेत. मी त्यांच्यासोबत असताना ते मला त्यांच्या योजनांबद्दल सांगत असे. एका दिवशी ते मला म्हणाले मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन.
दरम्यान, केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांची मदत घेण्यात अजिबात संकोच वाटत नाही, असा आरोपही त्यांनी केला.