पुणे {प्रभात वृत्तसेवा} : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या नागरिकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत पुणेकरांनी गेल्या २० दिवसात तब्बल २२ लाख ८ हजार रूपयांचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा केला असून सुमारे ३ हजार ०८ नागरिकांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता पुणेकर दिवसाला दंडापोटी सरासरी १ लाख रूपये महापालिकेच्या तिजोरीत भरत असल्याचे वास्तव आहे.
शहरात महापालिकेकडून दररोज मोठया प्रमाणात स्वच्छता केली जात असली तरी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. अशा नागरिकांवर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून दैनंदिन स्वरूपात कारवाई केली जाते.
मात्र, महापालिकेडून या कारवाईसाठी आकारण्यात येणारा दंड अतिशय नगण्य असल्याने नागरिकांकडून महापालिकेस जुमानले जात नव्हते. त्यानंतर पालिकेने ही बाब लक्षात घेऊन कारवाईची व्यप्ती वाढविण्यासह, दंडाची रक्कमही ५०० रूपये केली आहे. तसेच, पाच परिमंडळाच्या स्तवरा धडक कारवाईची स्वतंत्र वाहन असलेली पथकेही तैनात करण्यात आलेली आहेत.
महापालिकेकडून १ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शहरात करण्यात आलेल्या कारवाईत २२ लाख ८ हजार २९० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सर्वाधिक १२ लाख ७८ हजार रूपयांचा दंड सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या २४०० नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे.
तर ३ लाख ४० हजार रूपयांचा दंड बंदी असलेल्या प्लॅस्टिक विक्रेत्यांकडून वसूल करण्यात आला असून बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणार्यांकडून २ लाख ५६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकानी लघुशंका करणे,पाळीव श्वानांनी रस्त्यावर घाण करणे, कचरा जाळणे, कचरा वर्गीकरण न करणे अशा प्रकरणीही दंड वसूल करण्यात आला आहे.