जुनी सांगवी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नदी किनारी गावांच्या ठिकाणी घाट बांधण्यात आले आहे. घाटांवर नागरिकांच्या सोयीसाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु नागरिक या घाटांवर अस्वच्छता, राडारोड टाकत असल्याने घाट परिसर अस्वच्छ बनत आहेत. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेस राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेच्या बाबत पुरस्कार प्राप्त झाला. शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. परंतु नागरिकच सोयीसुविधा देऊन देखील वापर करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सांगवी येथील नदीच्या घाटाची दुरवस्था झाली आहे. घाटाच्या वरच्या बाजूस अद्ययावत स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. परंतु नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर न करता घाटाच्या परिसरात लघुशंका व संडास करत असल्याने घाट परिसर अस्वच्छ झाला आहे.
तसेच परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पवित्र घाटांचे विद्रुपीकरण होत असून याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने घाटावर नागरिकांना जाणे कठीण झाले आहे. घाटाच्या परिसरात गवत, दगड दिसून येत आहे. आरोग्य विभागाने घाटाची साफसफाई नियमित करून अस्वच्छता करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी डॉ. चंद्रशेखर पवार यांनी केली आहे.