पुणे – शहरात “ऑक्टोबर हिट’ दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्याने पुणे त्रस्त झाले आहेत. मंगळवारी सायंकाळनंतर उकाडा चांगलाच जाणवत होता. पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ होत असल्याने 27 अंशापर्यंत खाली आलेले कमाल तापमान आज 35 अंशापर्यंत पोहचले. त्यात दोन दिवसांपासून किमान तापमानातही वाढ झाल्यामुळे संध्याकाळी हवेतील गारवा कमी झाला आणि पर्यायाने उकाडा वाढला. गेल्या 24 तासात मगरपट्टा, कोरेगाव पार्क, हडपसर भागात किमान तापमान 22 ते 24 च्या आसपास, तर शिवाजीनगर, पाषाण, एनडीए भागातील किमान तापमान 19 ते 21 अंशाच्या आसपास होते.