पुणे – सायकलिंग असोसिएसन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने व क्रीडा प्रबोधिनी माजी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या दिवशी आशिष पवार, समरजीत थोरबोले, आकांक्षा म्हेत्रे, वेदांत जाधव आणि झायना पिरखान यांनी आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील राज्य शासनाच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलामधील सायकलिंग व्हेलोड्रमवर झालेल्या या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली. युथ बॉईज 500 मीटर्स टायम ट्रायल प्रकारात पुण्याच्या आशिष पवारने(39.86 सेकंद) वेळ नोंदववत प्रथम क्रमांक पटकावला. तर संस्कार घोरपडे (पुणे 42.01 सेकंद) व अनुभव पवार (पुणे 49.08 सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा उदघाटन समारंभ पोलीस अधिकारी शत्रुघ्न माळी यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, मुख्य पंच सुभाष पोवळे, अनिल तांबे, शिवछत्रपती पारितोषीक सन्मानीत उत्तम नाळे, मिलींद झोडगे, दिपाली निकम आदी मान्यवर हजर होते. या स्पर्धेतून रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यातही ट्रायल प्रकारात पुण्याच्या खेळाडूंनी सिद्ध केलेली मक्तेदारी अशीच कायम राहील, असा विश्वास वाटतो.