नियमांसह “अनलॉक’नंतर सर्वच प्रमुख रस्त्यांवर कोंडी
पुणे – संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर पुणेकर आता पुन्हा घराबाहेर पडत आहेत. मात्र खोदकामे, अपुरे पार्किंग, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती यांमुळे “अनलॉक’च्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे “लॉकडाऊनमधून सुटून वाहतूक कोंडीत अडकलो’ असल्याची भावना वाहनचालकांनी व्यक्त केली.
सोमवारपासून ऑफिसेस, विविध दुकाने, रेस्टॉरंट, उद्याने, व्यायामशाळा, सलून नियमांसह खुल्या केल्या. परिणामी, सोमवारी दिवसभर वर्दळ वाढली होती. प्रामुख्याने सकाळी कामाचे ठिकाण गाठण्यासाठी नोकरदारांची लगबग सुरू होती. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि पीएमपी आदी वाहने रस्त्यावर उतरल्याने सर्वच प्रमुख रस्त्यांवर कोंडी झाली.
मध्यवर्ती भागातील टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, डेक्कन, कर्वे रस्ता, वारजे, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, जंगली महाराज रस्ता, मार्केटयार्ड आदी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपनगरांतील अनेक चौकांत वाहतूक कोंडी आणि संथ गतीने सुरू असणाऱ्या वाहतुकीमुळे चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
बाजारपेठांमध्ये देखील कोंडी
बऱ्याच कालावधीनंतर नियम शिथिल केल्याने नागरिकांनी बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी केली होती. मार्केटयार्ड, मंडई, शनिपार, रविवार पेठ, फर्गसन महाविद्यालय रस्ता, तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक या भागांत ये-जा करणाऱ्या नागरिकांची अधिक होती. त्यामुळे या भागांत अपुरे रस्ते, दुतर्फा उभी असणारी वाहने, बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे आदीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.