पहिले वर्ष हा बाळाच्या वाढीचा महत्त्वाचा काळ असतो. या काळात बाळाच्या शरीराची व विशेषतः मेंदूची झपाट्याने वाढ होत असते. बाळ एक वर्षाचे पूर्ण होईपर्यंत साधारणपणे बाळाचे वजन जन्मावेळेसच्या वजनाच्या तिप्पट होते.
उदा. जन्मावेळी बाळाचे वजन तीन किलो असेल तर पहिल्या वाढदिवसापर्यंत ते नऊ किलोच्या आसपास भरते.
(म्हणजेच पहिल्या वर्षात बाळाचे वजन पाच ते सहा किलोने वाढते.) या प्रमाणात वजन वाढले तर बाळाचा आहार योग्य प्रकारे चालला आहे असे लक्षात येईल. पुरेशा प्रमाणात वजन वाढले नाही तर बाळाला वरचे अन्न अपुरे पडत आहे किंवा ते योग्य प्रकारे बनवले जात नाही असे समजावे.
बाळाचे वजन जर जास्त वाढले तर बाळाला चुकीचे अन्नपदार्थ दिले जात आहेत किंवा प्रमाणापेक्षा जास्त आहार दिला जात आहे असे असे समजावे. या दोन्ही बाबतीत वेळीच डॉक्टरांचा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
एक वर्षानंतर मात्र बाळाची वाढ काहीशी मंदावते. एक ते दोन वर्षे या पुढील एक वर्षाच्या काळात बाळाचे वजन फक्त दोन ते तीन किलोनेच वाढते. लहानपणी गुटगुटीत आणि गुबगुबीत दिसणारी बाळे जराशी बारीक दिसायला लागतात! पण हे सर्वसामान्य आहे.
जसे बाळ एक वर्षाचे होते तसे ते हळूहळू घरातील इतरांसाठी केलेले सर्व पदार्थ खाऊ शकते. काही बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागते. एक ते दोन वर्षे वयाच्या काळात बाळाच्या आहाराची काय काय काळजी घ्यायची ते आता पाहू.
बाळाला सगळ्या वेगवेगळ्या चवी आणि पदार्थांचा, भाज्या – फळांचा आस्वाद घेऊ द्या. बर्याच घरांमध्ये बाळ वर्षाचे झाले तरी त्याला फारशी भाज्या – फळे देण्यात येत नाहीत. लहानपणी बाळांचे खाण्याचे जे ठराविक पदार्थ असतात, तेच दिले जातात. उदा. सकाळी दूध, दुपारी वरण-भात, रात्री परत दूध-पोळी किंवा वरण-पोळी. या आहारातून बाळाला पुरेशी जीवनसत्वे, खनिजद्रव्ये मिळणार नाहीत. रोज तेच तेच जेवण देणे टाळा.
आहारात विविधता ठेवा. बाळाच्या दररोजच्या आहारात खालील पाच प्रमुख अन्नप्रकारांचा समावेश हवा.धान्ये व कंदमुळे : जेवणात रोज पोळी एके पोळी न देता बाळाला कधी भाकरी, कधी मिश्र धान्यांच्या पीठाचे थालिपीठ, नाचणीचे घावन असे वेगवेगळे पदार्थ द्यावे. एका वेळेच्या जेवणात तांदळाचा किंवा वरईचा भात, इडली, डोसा, रताळे किंवा शिजवलेला बटाटा देता येईल. लक्षात ठेवा, बटाटा हा भाजी प्रकारात मोडत नाही! त्यामुळे बटाट्याचा पराठा किंवा पोळीबरोबर बटाट्याची भाजी देणे टाळा.
भाज्या व फळ : एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाला सर्व भाज्या व सर्व फळे देता येतात. दिवसभरात किमान एक वाटी भाजी आणि एक संपूर्ण फळ बाळाच्या पोटात जायला हवे. ते दोन वेगवेगळ्या वेळी विभागून देता येईल. फळे व भाज्यांचा रस (ज्यूस) करून देणे टाळावे. काळे मनुके, खारीक, सुके अंजीर, जरदाळू यांचाही आहारात समावेश करावा.
डाळी, कडधान्ये व मांसाहारी पदार्थ : प्रथिनांसाठी हे पदार्थ महत्वाचे आहेत. बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी व कडधान्ये मऊ शिजवून द्यावीत. मांसाहारींनी एक वर्षानंतर हळूहळू बाळाला अंड्याचा पांढरा भाग आणि मऊ शिजवलेला मासा किंवा चिकनचे दोन-तीन तुकडे द्यायला हरकत नाही. सुरुवातीला थोड्या प्रमाणात देऊन हे पदार्थ चांगले पचतात ना याची खात्री करावी. चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ व प्रथिनांसाठी बाळांना दररोज थोडे काजू, बदाम, अक्रोड, शेंगदाणेही द्यावे.
दूध व दुधाचे पदार्थ : शाकाहारींच्या आहारात दूध हा महत्त्वाचा घटक आहे. रोज थोड्या प्रमाणात (प्रत्येकी एक कपभर) दूध व दह्याचा आहारात समावेश करावा. दही ताजे व घरी लावलेले असावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पनीर, चीज द्यायलाही हरकत नाही.
(भाग 2 पुढील अंकात)