पुणे – पुनित बालन ग्रुपतर्फे आयोजित पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात कर्णधार उत्कर्षा पवार हिने केलेल्या कामगिरीच्या जोरावर कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाने सिम्हा वॉरीयर्स संघाचा सुपरओव्हरमध्ये रोमहर्षक विजय मिळवून उद्घाटनाचा दिवस गाजवला.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा सलामीचा सामना सिम्हा वॉरीयर्स आणि कुंतिविमलजी सुपरस्टार्स यांच्यामध्ये रंगला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सिम्हा वॉरीयर्स संघाने ईश्वरी सावकार हिने केलेल्या नाबाद 50 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 7 गडी गमावून 100 धावांचे आव्हान उभे केले. कुंतिविमलजी सुपरस्टार्सची कर्णधार उत्कर्षा पवार हिने 17 धावांत 3 गडी बाद करत सिम्हा वॉरीयर्सची आघाडीची फळी कापून काढली.
या आव्हानाचा पाठलाग करताना कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाची सुरूवातही खराब झाली. संघाने पहिल्या चार षटकात 16 धावांवर 4 गडी गमावले होते. पण कर्णधार उत्कर्षाने 56 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांसह 59 धावा करत एकहाती लढा दिला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. 18 व्या षटकात उत्कर्षाने एका षटकार आणि चौकारांच्या मदतीने 15 चोपल्या व संघाचा विजय आटोक्यात आणला. 12 चेंडूत 3 धावा आणि कुंतिविमलजी संघाचे सहा गडी बाद असे समीकरण सामन्यात झाले होते. सायली लोणकर हिने 19 वे षटक निर्धाव टाकत 1 गडी बाद करत सामन्यात रंग भरले.
अखेरच्या षटकात सिम्हा वॉरीयर्सच्या गोलंदाज माया सोनावणे हिने पहिल्याच चेंडूवर दोन धावा दिल्या आणि दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली. दुसऱ्या चेंडूवर मायाने उत्कर्षाला त्रिफळाचीत करून सामन्यात रंगत आणली. पुढच्याच चेंडूवर रिया सोनावणेचा स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडून सुपरस्टार्स संघाला अडचणीत आणले. 3 चेंडूत एक धाव, असे समीकरण असताना फलंदाज सलोनी गिरी ही चोरटी धाव घेताना धावबाद झाली आणि सामना टाय झाला.
यानंतर सामन्यात सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये कुंतिविमलजी सुपरस्टार्सने एका षटकात 14 धावा फटकावल्या पण, सिम्हा वॉरीयर्स संघाला एका षटकात 6 धावाच करता आल्या. सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या उत्कर्षा पवार हिला सामनावीर किताब देण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन माणिकचंद ऑक्सिरिचच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व संघाचे कर्णधार, खेळाडू आणि संघ मालक आदि उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजक सनी मारवाडी कार्यक्रमाचे आभार मानले.
स्पर्धेचा निकाल – 1) सिम्हा वॉरीयर्स – 20 षटकात 7 गडी बाद 100 धावा (इश्वरी सावकार नाबाद 50, रसिका शिंदे 10, उत्कर्षा पवार 3-17, उत्कर्षा देशपांडे 1-13) पराभूत वि. (सुपर ओव्हर) कुंतिविमलजी सुपरस्टार्स – 19.4 षटकात 10 गडी बाद 100 धावा (उत्कर्षा पवार 59, वैष्णवी पाटील 9, रसिका शिंदे 2-29, सायली लोणकर 2-9, माया सोनावणे 2-19); सुपर ओव्हर – कुंतिविमलजी सुपरस्टार्स – (1 षटकात 14 धावा); सिम्हा वॉरीयर्स – (1 षटकात 6 धावा); सामन्याची मानकरी – उत्कर्षा पवार;