पुणे -मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी रेंजहिल येथे (कृषी महाविद्यालयाची मागील बाजू) मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 12 हेक्टर जागेत हा डेपो उभारण्यात आला आहे.
दरम्यान, हे काम पूर्ण झाल्याने रेंजहिल कार डेपो ते रेंजहिल स्थानक अशी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. ठीक 5 वाजून 15 मिनिटांनी ट्रेन रेंजहिल डेपो इथून निघाली व 5 वाजून 35 मिनिटांनी सुमारे एक किलो मीटरचे अंतर पार करून रेंजहिल स्थानकात आली. या यशस्वी चाचणीमुळे लवकरच रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक व सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे भूमिगत स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
रामवाडी ते वनाज या मार्गिकेसाठी कोथरूड हिल व्हिव पार्क (पूर्वीचा कचरा डेपो) या जागेवर मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आलेली आहे.
अशी होणार देखभाल दुरुस्ती
रेंजहिल डेपोमध्ये 18 ट्रेनच्या मेंटेनन्ससाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डेपोमध्ये 18 स्टेबलिंग लाइन, तीन इंस्पेक्शन, चार रिपेअर बेलाईन, एक पिट व्हील लेथ आणि एक इंजिनिअरिंग ट्रेन युनिट (एढण) लाइनची उभारणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट (अउथझ), पिट व्हील लेथ, पिट जॅक, मोबाइल जॅक, बोगी टेस्ट स्टॅन्ड (एजढ) क्रेन इत्यादी प्लांट आणि मशिनरी बसवण्यात आली आहे. सध्या रेंजहिल डेपो येथे चार ट्रेन प्राप्त झाल्या असून, त्यांच्या चाचण्या चालू आहेत. त्यात लवकरच रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक व सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे भूमिगत स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असून, त्यानंतर मेट्रो सुरक्षा आयुक्तांची मान्यता घेऊन हा मार्गही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर ते पिंपरी-महापालिकेपर्यंतची थेट मेट्रो सेवा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.