पुणे -शहरातील रिक्षा चालकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी आरटीओने अखेर तात्पुरती सोय केली आहे. यात “आपले सरकार’चा 1800-120-80-40 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले.
प्रवाशांकडून मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, बेशिस्त वर्तन, जवळचे भाडे नाकारणे अशा अनेक तक्रारी रिक्षा चालकांच्या विरोधात नागरिक सातत्याने करत असतात. यासाठी रिक्षा चालकांविरोधात विविध तक्रारी देण्यासाठी नागरिकांकडून हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एक लाखांवर अधिक रिक्षा चालक दररोज प्रवासी सेवा देत आहेत. शहरात रिक्षाने प्रवास करताना बरेच चांगले-वाईट अनुभव नागरिकांना येत असतात. शहरात प्रवाशांकडून मीटर पेक्षा जास्त भाडे आकारणे, प्रवाशांची बेशिस्त वर्तन, जवळचे भाडे नाकारणे अशा अनेक समस्यांना नागरिक तोंड देत असतात. मात्र, आतापर्यंत त्याबाबत ठोस पावले उचचली गेली नाहीत.
आठ महिन्यांत केवळ 34 तक्रारी
रिक्षा चालकांविरोधात तक्रारी करायच्या कुठे हे माहिती नसल्यामुळे किंवा प्रक्रिया किचकट असल्याने नागरिक तक्रार करत नाहीत. रिक्षा चालकांविरोधात कारवाईसाठी आरटीओकडे तक्रार आवश्यक आहे. यासाठी ईमेल आयडी, पोस्टाने अथवा प्रत्यक्ष येऊनच तक्रार करावी लागते. तक्रार करण्यासाठीची यंत्रणा किचकट असल्यामुळे आरटीओकडे खूपच कमी तक्रारी येतात. परिणामी, गेल्या आठ महिन्यात आरटीओकडे फक्त 34 तक्रारी आल्या आहेत.
येथे करा तक्रार
1800-120-80-40