पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील तापोळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घाटात रविवारी रात्री ब्रेकफेल झालेला टेम्पो 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन युवक जखमी झाली असून यामध्ये टेम्पोसह इलेक्ट्रीक साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात मेटगुताड येथून तापोळाच्या दिशेने इलक्ट्रिक साहित्य घेऊन निघालेला 407 टेम्पो (क्रमांक एम एच 11 एजी 7745) ब्रेक फेल झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट दोनशे फूट दरीत कोसळला.
रविवारी सायंकाळी टेम्पो तापोळाच्या दिशेने निघाला होता. चिखली शेड परिसरातील वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो थेट दोनशे फूट दरीत कोसळला झाड व चिमटीमध्ये अडकला. या टेम्पोमध्ये तीन युवक होते. रात्रीच्या अंधारात यामधील एक युवक झाड, फाद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला. या अपघाताची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांना दिली. या अपघाताची माहिती मिळताच चिखलीचे शिवसेनेचे संतोष जाधव व सहकारी तसेच सहयाद्री ट्रेकर्सचे किरण चव्हाण संजय पार्टे व दीपक जाधव यांनी अंधारात अपघातातील जखमींना बाहेर काढले. 108 रुग्णवाहिका तसेच संतोष जाधव यांच्या खासगी गाडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
श्रीकांत गणपत बावळेकर (वय 24), विजय बजरंग मोरे (वय 25) व सुरज यशवंत घाडगे (वय 26) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात एका युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर एकाला किरकोळ दुखापत झाली असून एकाच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी दोघांना त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.