पुणे – शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची जागा महामेट्रोला देण्यात आली आहे. या जागेच्या बदल्यात महामेट्रो कंपनी उरुळी देवाची येथील गायरान जागेत 1हजार 800 टनांची पाच ते सहा गोदाम बांधून देणार आहे. वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. तर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आले आहे. या तिन्ही मेट्रो मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत.
या ठिकाणी बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल हब) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाची जागा महामेट्रोला देण्यात आली आहे. तर शहराचे धान्य गोदाम तात्पुरते फुरसुंगी येथे खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे.उरुळी देवाची येथील सुमारे १४ एकर गायरान जागा आहे. त्यापैकी काही जागा मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. तसेच या जागेची पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.