पाथर्डी – शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान संघाने प्रथम क्रमांक पटकावून पाच लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस मिळवले आहे. यावेळी गाहिनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, अमोल गर्जे, राहुल कारखेले, सुनील ओव्हळ, बंडू पठाडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ तर आयोजक सुभेदार सतीश शिरसाट, अमोल शिरसाट, किसन आव्हाड, अतुल शिरसाट, भाऊसाहेब शिरसाट, राम फुंदे, साचिन शिरसाट आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
जगदंब पावन गणपती प्रतिष्ठान पाथर्डी व यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान या दोन्ही संघाचा झालेला शेवटचा अटीतटीचा सामना पाहण्यासाठी पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड मैदानात हजारोंच्या संख्येने क्रिकेट रसिक उपस्थित होते. पाथर्डीकरांना क्रिकेट स्पर्धेची अनोखी पर्वणी शिरसाट स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळाली.प्रथम यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान शिरूर,
द्वितीय जगदंब पावन गणपती,पाथर्डी, तृतीय क्रमांक एलके स्टार राजशक्ती, चौथा क्रमांक एनबी अवध तर फायनल मॅन ऑफ द मॅच कुणाल खोंड ३९ धावा, सर्वोत्कृष्ट फलंदाज कुणाल खोंड ८१ धावा, सर्वोत्कृष्ट गोलंदाज भूषण गोळेने १० बळी, मॅन ऑफ द सिरीज नीलेश इंगवले ८३ धावा आणि १० बळी. सुमारे नऊ लाख रुपयांचे रोख पारितोषिके विजेता चार संघांना देण्यात आले. प्रथम विजेत्यांना ५ लाख ११,१११ उपविजेत्यास २ लाख ५१’१११, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघास १ लाख तर चतुर्थ क्रमांकावर विराजमान संघास ७५ हजार व ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. विजेता संघ मालक व मॅन ऑफ द सिरीज या व्यक्तींना दुचाकी भेट देण्यात आली.
गेल्या पाच दिवसापासून डे नाईट अशी ही स्पर्धा भरवण्यात आली होती. मिनी वर्ल्ड कपचा थरार पाथर्डीकर अनुभवत होते. शिरसाट स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने तिसऱ्या चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. अकादमीचे संचालक अमोल शिरसाट, सुभेदार सतीश शिरसाट, अतुल शिरसाट, अर्जुन वणवे हे नेव्हीच्या रोइंग टीममधील नामांकित खेळाडू असून, त्यातील काही निवृत्त झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, म्हणून शहरात पार पडत असलेल्या स्पर्धेच्या धर्तीवर त्यांनी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी अभय आव्हाड यांनी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून दिले. एखादा खेळाडू वादग्रस्तरीत्या बाद झाला, तर कॅमेऱ्याच्या आधारे रिव्ह्यू घेण्याची संधी सुद्धा अद्ययावत तंत्रज्ञानाने उपलब्ध करून देण्यात आली होती.