खडकवासला (विशाल भालेराव) -पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर असताना मागील 11 गावांसाठी दोनच नगरसेवक मिळाले. त्यात नव्याने 23 गावे समाविष्ट करताना या गावांसाठी किती प्रभाग असणार? याकडे लक्ष लागलेले असताना खडकवासला तसेच परिसरासाठी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील मतदारांचा प्रभाग क्र. 53 नव्याने तयार करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 63 हजार मतदान असून खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी ही संपूर्ण तर नांदेड, धायरी, नऱ्हे या गावांतील काही भागाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
प्रभाग रचनेत गावे तोडू नयेत, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली होती परंतु, या प्रभागात नांदेड, धायरी, नऱ्हे या गावांचा काही भाग तोडून तो या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. मोठा प्रभाग असल्याने युती, आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा कल सध्या तरी दिसत आहे.
प्रस्थापितांच्या सोयीसाठी केलेल्या या प्रभागरचनेमुळे स्थानिक गावे व मतदारांवर अन्याय होऊन समाविष्ट भागाच्या विकासावर विपरित परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. नऱ्हे, नांदेड, आंबेगाव या गावांचे विविध प्रभागात विभाजन करण्यात आले आहे. खडकवासला मतदारसंघात शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय मित्र पक्ष राष्ट्रवादीला लक्ष्य साध्य करताच येणार नाही.
– नितीन वाघ, खडकवासला विधानसभा प्रमुख, शिवसेना
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व जिल्हाध्यक्ष संजय जगताप हेच घेतील.
– किशोर रायकर, अध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ, कॉंग्रेस
नांदेड, नऱ्हे, आंबेगाव ही गावे प्रभाग रचनेत तोडली गेली. समाविष्ट गावातील मतदारांचा प्रभाग करून तेथील उमेदवारांना संधी उपलब्ध करून त्या भागांमध्ये विकास करता आला असता. परंतु, हा प्रभाग प्रस्थापित लोकांना सोयीचा बनवला गेला आहे. यामध्ये पैसा आणि सत्तेचा दूरपयोग करून निवडणूक लढली जाईल, हे निश्चित.
– विजय मते, मनसे अध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व जिल्हाध्यक्ष संजय जगताप हेच घेतील.
– किशोर रायकर, अध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ, कॉंग्रेस