पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हवेली तालुक्यातील वडाचीवाडी येथे 134.79 हेक्टरवरील “टीपी स्कीम’ अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. या “टीपी स्कीम’ला राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यास “पीएमआरडीए’च्या प्रस्तावित रिंगरोडसाठी या योजनेतून सुमारे 10 हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
“पीएमआरडीए’ हद्दीचा विकास नियोजनबद्ध व्हावा, या हेतूने प्रारूप विकास आराखड्यात 20 हून अधिक “टीपी स्कीम’ प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. हद्दीतील प्रस्तावित रिंगरोडच्या परिसरात या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून रिंगरोडसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध संपादित करणे सोईचे व्हावे, हा हेतू त्यामागे ठेवण्यात आला आहे.
हवेली तालुक्यातील वडाचीवाडी येथील 134.79 हेक्टर क्षेत्रावर ही योजनेचे प्रस्तावित करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी “पीएमआरडीए’चे आयुक्त यांच्या स्तरावर या योजनेचे प्रारूप मंजूर करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारकडून प्रारूप योजनेवर नागरिकांच्या दाखल हरकतींवर वैयक्तिक सुनावणी घेण्यासाठी लवाद म्हणून रवींद्र जायभाये यांची नेमणूक करण्यात आली होती. या लवादाच्या माध्यमातून सुनावणीचे काम पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात आली आहे. या नगर रचना योजनेतून 65 मीटर रुंदीच्या 1.5 कि. मी. रस्तासाठी लागणारे सुमारे 10 हे. क्षेत्र पीएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. या “टीपी स्कीम’ला शासन मान्यता मिळताच त्याची अंमलबजावणी होईल.
टीपी स्कीमची वैशिष्ट्ये
50 टक्के क्षेत्राचे 1 हजार 700 खातेदार शेतकऱ्यांना 148 विकसित भूखंडाचे होणार वाटप
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या गृह योजनासाठी 11.72 हेक्टर क्षेत्राचे 9 भूखंड आरक्षित
या योजनेच्या क्षेत्रात सुमारे 19.22 टक्के क्षेत्र (25.33 हे.आर.) रिंगरोडसाठी (9.83 हे.)
अंतर्गत रस्ते यासाठी 15.50 हेक्टर
मैदानांसाठी 7 भूखंड, बगीचासाठी 11 भूखंड, बालोद्यानासाठी 8 भूखंड प्रस्तावित
ग्रीन बेल्टसाठी 2 भूखंड व 2 खुल्या जागा प्रस्तावित
नागरी सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, भाजीपाला केंद्र, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, बसस्थानक, शॉपिंग सेंटर, यासाठी देखील भूखंड आरक्षित.