पुणे – महापालिकेकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांंमधील नागरिकांसाठी राबविण्यात येणार्या नागरिकांसाठीच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना वर्षभर सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केली आहे. या शिवाय, या योजनेअंतर्गत दिल्या जाणार्या खर्चाची रक्कमही वाढविण्याची मागणी निम्हण यांनी केली आहे. याबाबतचे पत्र निम्हण यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांंना दिले आहे.
महापालिकेकडून शहरी गरीब योजनेच्या सभासद नोंदणीसाठी एप्रिल ते जुलै याच कालावधीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे या मुदतीनंतर शहरात वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच, आजारी पडणे अथवा एखादा गंभीर आजार समोर येणे, नागरिकाच्या नियंत्रणात नसते परिणामी हा निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी निम्हण यांनी केली आहे. तर केवळ सभासद नूतनीकरणासाठी असलेल्यांनाच ही मुदत असावी, असेही या पत्रात नमूद केले आहे.
खर्चाची मर्यादा वाढवावी
महापालिका २०११ पासून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवत आहे. यामध्ये पिवळे, केशरी रेशनकार्ड, झोपडपट्टीमध्ये राहणारे सेवाशुल्कधारक व ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांच्या आत असणाऱ्या शहरी गरीब कुटुंबांसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेत आजारासाठी १ लाख तर मोठ्या आजारांसाठी २ लाखापर्यंत मदत देण्यात येते.
परंतु योजना सुरू झाली, तेव्हाचे नागरिकांचे उत्पन्न व आजचे उत्पन्न यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख ६० हजारांऐवजी अडीच लाख करावी, तसेच वैद्यकीय खर्चाची मर्यादा १ लाखांऐवजी २ लाख तर काही आजारांसाठीची २ लाखांऐवजी ३ लाख करावी, अशी मागणीही निम्हण यांनी केली आहे.