इचलकरंजीची पूजा मुळे अकराव्या स्थानी
पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. यात इचलकरंजी येथील माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे ही देशात 11 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पुण्याची तृप्ती धोडमिसे हीने देशात 16 वा क्रमांक मिळविला आहे. यूपीएससी निकालात कनिष्क कटारिया हा देशात प्रथम, सृष्टी देशमुख हिने देशात पाचवा क्रमांक मिळविला असून, महिलांमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
यूपीएससी परीक्षेसाठी 10 लाख 65 हजार 552 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 4 लाख 93 हजार 972 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यातील 10 हजार 468 उमेदवार मुख्य लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी 1 हजार 994 उमेदवार व्यक्तिमत्त्व टेस्टसाठी पात्र ठरले आहेत. त्यातून अंतिम 759 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात 577 मुले, तर 182 मुलींचा समावेश आहे. या सर्वांची नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे. कनिष्क कटारिया हा देशात प्रथम, अक्षत जैनने द्वितीय, जुनैद अहमदने तृतीय, तर श्रेयनास कुमात चौथा, तर सृष्टी देशमुख पाचवा क्रमांक पटकावला. पहिल्या 25 मध्ये 15 मुले, तर 10 महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील उमेदवारांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. देश पातळीवरील पहिल्या 50 उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे. पूजा मुळे 11 वे, तृप्ती धोडमिसेने 16 वे, वैभव गौंदवेने 25 वे, मनीषा आव्हाळेने 33 वे, हेमंत पाटीलने 39 वे स्थान प्राप्त केले. स्नेहल धायगुडेने 108 वे, दिग्विजय पाटीलने 134, अमित काळेने 212 वे, योगेश पाटीलने 231 वे स्थान मिळवले.
ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आयएफएस
माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना परराष्ट्र सेवेतून निवृत्त होऊन केवळ तीनच महिने उलटत असताना त्यांची कन्या पूजा हिने देशभरातून 11 वा क्रमांक पटकावून आयएफएस रॅंक मिळवला आहे. विशेष म्हणजे, तिच्या वाढदिवसाची दिवशी तिला ही अत्यंत आनंदाची बातमी समजली आहे. परराष्ट्र खात्यात सेवा बजाविण्याची मुळे कुटुंबीयांची परंपरा पूजा हिने कायम राखल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिकाटी आणि जिद्द सोडू नका : तृप्ती धोडमिसे
“यशाचा आनंद तर खूप आहे. सर्वांच्या पाठिंब्यावर मी इथंपर्यंत पोहोचू शकले. मी निराश होऊन अभ्यास सोडणाऱ्या मुलांना एवढंच सांगेन की, तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडू नका, स्वप्न आपोआप तुमचा पाठलाग करत भेटायला येतील, अशी प्रतिक्रिया देशात 16 वे स्थान मिळविलेली पुण्याची तृप्ती धोडमिसे यांनी दिली. त्यांचे आई-वडील प्राथमिक शिक्षक. पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी)मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्याच प्रयत्नात पुण्यात त्या सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या. आता त्यांचे सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.