पुणे – विद्यापीठांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन!

पुणे -राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठामधील कोणत्याही वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे आता परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन असा संभ्रम दूर झाला आहे.

राज्य सरकारकडून नुकतेच करोनासंदर्भात नियम लागू केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेसंदर्भात उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची बैठक घेतली. त्यात विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाल्याचे सामंत यांनी म्हटले. आतापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन असे पर्याय देण्यात आले होते. विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा सुरूदेखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व अकृषी विद्यापीठांना ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. करोनाच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की, महाराष्ट्रातल्या सर्व 13 अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत. तसेच कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

पुणे विद्यापीठाची यापूर्वीच आघाडी
राज्य सरकारने ऑफलाइन व ऑनलाइन असे पर्याय दिले होते. मात्र, विद्यापीठाने करोनाची सध्याची स्थिती लक्षात घेता यापूर्वीच सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू झाल्या असून, परीक्षा योग्य पद्धतीने सुरू आहेत. शासनाने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला असला त्याची अंमलबजावणी विद्यापीठाने त्यापूर्वीच सुरू केली आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.