पुणे -“दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत एक बनावट मेसेज सध्या व्हायरल झाला आहे. पण, अशी कोणतीही माहिती किंवा संदेश अधिकृत नाही. हा संदेश खोटा असून अशा बनावट माहितीला कोणीही बळी पडू नये,’ असे आवाहन माहिती व जनसंपर्क प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी केले आहे.
सध्या सोशल मीडियावर “कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुण्यासह काही जिल्ह्यांत फिरत आहे. काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक हा खोटा मेसेज पसरवत आहेत. या संदेशामध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. अशी कोणतीही माहिती किंवा संदेश पुणे विभागातील जिल्ह्याकडून काढण्यात आलेला नाही. हा संदेश खोटा असून, अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल, असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरवणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले आहे.