होर्डिंग्ज अधिकृत करण्यास फलक मालकांची उदासीनता
“पीएमआरडीए’ने 102 जणांना बजावल्या नोटीस
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हद्दीतील क्षेत्रासाठी जाहिरात फलक (होर्डिंग) धोरण मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार होर्डिंगधारकांकडून अधिकृत करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. “पीएमआरडीए’च्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग्जची संख्या हजारोंच्या घरात असताना ते अधिकृत करण्यासाठी फक्त 25 अर्ज आले आहेत. दरम्यान, “पीएमआरडीए’ने आतापर्यंत 200 अनधिकृत होर्डिंग्जचा शोधले आहेत. यातील 102 मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुदतीत होर्डिंग्ज अधिकृत करून न घेतल्यास ते जमीनदोस्त करण्याचा इशारा “पीएमआरडीए’ने दिला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर पीएमआरडीए क्षेत्रात जाहिरात फलक धोरण नसल्याचे समोर आले होते. तसेच हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदा जाहिरात फलक उभारल्याचेही दिसून आले होते. धोरण नसल्याने कारवाई करण्यात मर्यादा होती.
या पार्श्वभूमीवर जाहिरात फलक धोरण काही महिन्यांपूर्वीच मंजूर करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. दरम्यान, आता काही होर्डिंग्जचे मालक सापडत नाहीत. अशावेळी जाहिरातीवरील नंबरवर संपर्क करून नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानुसार पुढील 15 दिवसांत उर्वरित 98 होर्डिंग्ज मालकांना नोटीस बजावण्यात येणार आहेत.
होर्डिंग उभारण्यासाठी पीएमआरडीएकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. होर्डिंग नियमित करण्यासाठी 25 अर्ज आले आहेत. त्यापैकी 5 अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता केली आहे. उर्वरित 20 अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली आहे.
– सुनील मरळे, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए
होर्डिंग्ज मालकाकडून हमीपत्र
कोणतेही होर्डिंग, फ्लेक्स उभारल्यानंतर कोणताही अपघात तसेच त्यामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास संबधित अर्जदार, मालक, परवानाधारक अभियंता अथवा वास्तुविशारद, स्ट्रक्चरल डिझायनर हे पूर्णपणे जबाबदार राहणार असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. अशा आशयाचे हमीपत्र परवानगी घेतेवेळी संबंधितांकडून घेतले जात आहे.