सूक्ष्म धुलिकण रोखण्याच्या उपाययोजना फक्त कागदावरच
पुणे – शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, पथ विभागाच्या ठेकेदारांकडून रस्त्यांची स्वच्छता हवेच्या प्रेशरने केली जात असून, प्रचंड धूळ उडवली जात आहे.
रस्ते स्वच्छतेवेळी पाणी वापरणे आवश्यक असताना खर्च वाचवण्यासाठी ठेकेदरांकडून वर्दळीच्या रस्त्यांवर धूळ उडवली जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ठेकेदारास सूचना दिल्याची माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. तसेच हे प्रकार न थांबल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
धायरी फाटा ते नवले हॉस्पिटल रस्त्याची दुरुस्ती सध्या सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्तीसाठी त्यावरील धूळ बाजूला करणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्रशर असलेल्या वाहनाने (बुमर) रस्ते साफ करणे आवश्यक आहे. पण, ठेकेदार थेट हवेच्या प्रेशरने रस्त्यावर वर्दळ असतानाही धूळ उडवली जात आहे.
विशेष म्हणजे, ट्रॅक्टर पुढे गेल्यानंतर धूळ पुन्हा जागेवर बसते आहे. या धुळीमुळे परिसरात वायू प्रदूषणही वाढले आहे. इतर वाहनांना या धुळीमुळे काहीच दिसत नसल्याचे चित्र आहे. तर, दुसऱ्या बाजूला रस्ता करायचा असल्यास आधी धूळ काढणे आवश्यक असते. अन्यथा डांबरीकरण योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे हे काम वर्दळ संपल्यानंतर करणे आवश्यक असते. असा दावा पथ विभागाने केला आहे.