पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात(वॉर्ड नं.16) नियुक्तीस आलेल्या दोन पोलिसांनी कर्तव्यात कसूर करून पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने 30 सप्टेंबर रोजी ललितचा साथीदारासह ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.
तपासात ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेणारा ललित पाटील अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपचार घेणाऱ्या ललितला नोटीस बजाविण्यात आली. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असतानाच 2 ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला होता. सध्या ललित पाटील आणि टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. नुकतीच त्यांची पोलीस कोठडी वाढविण्यात आली. दरम्यान, पोलिसांवर चारही बाजूने टीका होऊ लागल्याने प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू केली.
चौकशीत दोषी आढळलेल्या बंदोबस्ताला असलेला एक सहायक निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (17 नोव्हेंबर) ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.
तसेच ईडीच्या कोठडीत असलेल्या विनय अऱ्हाना, त्याचा चालक आणि व्यवस्थापक यांनाही अगोदर अटक करण्यात आली आहे. दरम्यान कोर्ट कंपनीचे कर्मचारी कर्तव्यावर असताना आरोपी पळून गेला आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे अटक करण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त, (गुन्हे) अमोल झेंडे यांनी सांगितले.