पुणे – शहरातील नागरिकांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी बुधवारपर्यंत (दि.2) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यादिवशी रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांना ऑनलाइन कर भरता येणार आहे. ही माहिती मनपा करसंकलन विभागाचे प्रमुख डॉ. अजित देशमुख यांनी दिली.
सवलतीत मिळकत कर भरण्यासाठी दि. 31 जुलै हा अंतिम दिवस होता. मात्र, सोमवारी सकाळपासूनच सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांना करच भरता येत नव्हता. त्यामुळे करभरणा केंद्रांवर रांगा लागल्या, तर दुसऱ्या बाजूला ऑनलाइनही कर भरता येत नव्हता. परिणामी, नागरिकांची शेवटच्या दिवशी गैरसोय झाली. त्यामुळे पालिकेने एक दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे शहरातील रस्ते सकाळपासूनच बंद राहणार असल्याने कर्मचाऱ्यांनाही वेळेवर कार्यालयात पोहचता येणार नाही. परिणामी, प्रशासनाने कर भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
सोमवार ठरला ‘मनस्ताप’वार
गेली दोन दिवस सुट्टी असतानाही करभरणा केंद्र सुरू होती. सोमवारी सकाळीच नागरिक करभरणा केंद्रावर पोहचले. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने कर भरण्यासाठी प्रचंड वेळ लागत होता. सकाळी दहा वाजता क्षेत्रीय कार्यालय सुरू झाल्यानंतर रांगा लागल्या होत्या. सव्वादहाच्या सुमारास ऑनलाइन यंत्रणा बंद पडली. ती जवळपास अडीच वाजता पूर्ववत झाली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.