जांबूत- बेल्हा – जेजुरी राज्य मार्गावरून ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला रस्त्यावरील धोकादायक एस कॉर्नरच्या वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक गटारात जाऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
आकाश भाऊसाहेब भांबेरे (गुळुंचवाडी, ता. जुन्नर) असे या चालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी (दि. 12) रात्री साडेअकरा वाजता झाला. याबाबतची माहिती समीर गोरक्षनाथ गायकवाड यांनी शिरूर पोलीस ठाण्यात येथे दिली. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ऊसाने भरलेला टाटा आयशर ट्रक (एमएच 14, जीडी 4991) बेल्हा- जेजुरी राज्यमार्गाने पराग ग्रो साखर कारखान्याकडे जात होता.
चांडोह- पिंपरखेड हद्दीवरील धोकादायक एस कॉर्नरवरील वळणाचा अंदाज ट्रक चालकाला न आल्याने ट्रक थेट रस्त्यावरून खोल गटारात जाऊन अपघात झाला. ट्रकमधील भरलेला ऊस ट्रक चालकाच्या कॅबिनवर पडल्याने त्याखाली चालक दाबला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे घटनास्थळी धाव घेतलेल्या प्रत्यक्षदर्शीकडून समजते.
ऊस वाहतूक करणारा ट्रक जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील असल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच पिंपरखेडचे पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, शरद बोंबे, सुभाष जगताप व स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य केले. रात्री एक वाजता टाकळी हाजी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन अपघाताची पाहणी करून पंचनामा केला.